शैक्षणिक तसेच नैसर्गिक रित्या परिपूर्ण असलेल्या कढेल (ता.तळोदा) येथील मतदान केंद्रावर घडले आदिवासी संस्कृतीचे दर्शन.
मतदान करण्यासाठी आलेल्या लोकांना प्रदर्शनातून समजली आदिवासी परंपरा.
तळोदा -: बोरद (ता.तळोदा) परिसरात असलेल्या कढेल येथे विधानसभा निवडणुकीसाठी मॉडेल मतदान केंद्र तयार करण्यात आले होते.
आदिवासी संस्कृती आणि लोकजीवन यावर आधारित विविध साहित्याचे प्रदर्शन या मतदान केंद्रावर मांडण्यात आले होते. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध पद्धती तसेच प्रयोग राबवले जात होते त्याअंतर्गत परिसरात असलेल्या कढेल येथील मतदान केंद्रावर मॉडेल मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली होती. या मतदार केंद्रात आदिवासी संस्कृती तसेच आदिवासी लोकजीवन यावर आधारित विविध साहित्य प्रदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवण्यात आले होते. हेच प्रदर्शन मतदारांचे आकर्षणाचे केंद्र ठरले.
या मतदान केंद्रावर मांडण्यात आलेल्या प्रदर्शनात आदिवासी समाजातील जनतेकडून वापरण्यात येणाऱ्या विविध वस्तू त्यात दागिने तसेच लग्नप्रसंगी वापरण्यात येणारे विविध वाजंत्रीचे साहित्य या ठिकाणी ठेवण्यात आले होते त्याचबरोबर या मतदान केंद्रावर विविध प्रकारचे फलक देखील लावण्यात आलेले होते त्यात आदिवासी संस्कृती विषयी व देव, देवता तसेच परिसरात असलेल्या पर्यटन स्थळांची माहिती देण्यात आली होती.
मॉडेल मतदान केंद्र उभारणीची संकल्पना निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष दळवी, तळोदा येथील तहसीलदार दीपक धिवरे, गटविकास अधिकारी काशिनाथ पवार व गट शिक्षणाधिकारी शेखर धनगर तसेच कढेल शाळेच्या शिक्षिका राजश्री पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली होती.
त्याचबरोबर या मतदान केंद्रात रांगोळीच्या माध्यमातून जनजागृती देखील करण्यात येत होती. या शाळेची माजी विद्यार्थिनी अनुष्का गिरासे हिने पहिल्याच वेळेस मतदान केले त्याचबरोबर याच विद्यार्थिनीने सुंदर व सुबक अशी रांगोळी देखील काढली व त्या रांगोळीच्या माध्यमातून मतदान जनजागृती देखील केली.
या मॉडेल मतदान केंद्राला केंद्रीय निरीक्षक दिनेश कुमार यांनी भेट देऊन पाहणी केली व संपूर्ण आदिवासी संस्कृतीची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. तसेच या उपक्रमाचे त्यांनी तोंभारून कौतुक देखील केले.