मोलगी येथील महिलेच्या अंगावरील दागिने चोरणारे इसम स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात!
आरोपींकडून 74 हजार 400 रुपयांचे चांदीचे दागिने हस्तगत

मोलगी येथील महिलेच्या अंगावरील दागिने चोरणारे इसम स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात!
आरोपींकडून ७४ हजार ४०० रुपयांचे चांदीचे दागिने हस्तगत.
१ जून २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत गुप्त माहिती मिळाली की, नंदुरबार शहरात सोनार गल्ली परिसरात दोन संशयित इसम त्यांच्या ताब्यातील पिशवीत काहीतरी दागिने कमी दरात विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत आहेत. ही खात्रीशीर माहिती मिळाल्यावर पोलिस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पथकास खात्री करून कारवाई करण्यास सांगितले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार सोनार गल्ली परिसरात शोध घेतला असता, दोन इसम सोनार गल्लीत सोनार खुंट परिसरात प्लास्टिकच्या पिशवीसह उभे असल्याचे दिसून आले. पथकाने त्यांच्याजवळ जाऊन विचारपूस करता त्यांनी त्यांची नावे यासिन रईस मक्राणी, वय- २२ वर्षे, रा. आमलीबारी फाटा, अक्कलकुवा, जि. नंदुरबार, मुस्तकीम खान अब्दुल शकुर मक्राणी, वय-२३ वर्षे, रा. इंदिरा नगर, अक्कलकुवा, जि. नंदुरबार अशी सांगितली. त्यांना त्यांच्या ताब्यातील पिशवीत काय आहे याबाबत विचारणा करता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने पथकास त्यांच्यावर अधिक संशय बळावला. त्यांच्या ताब्यातील पिशवीची झडती घेता त्यात पांढऱ्या धातूचे दागिने दिसून आले.
सदर दागिने चोरीचे असल्याचा दाट संशय आल्याने पथकाने दोन्ही इसमांना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस करता, त्यांनी ते दागिने काही दिवसांपूर्वी अक्कलकुवा ते मोलगी दरम्यान एका ठिकाणी महिला झोपलेल्या अवस्थेत असताना तिच्या अंगावरून काढून घेतल्याची माहिती दिली. त्या अनुषंगाने पथकाने मोलगी पोलिस ठाणे येथे सदर बाबत माहिती घेऊन खात्री केली असता, मोलगी पोलिस ठाणे येथे वरील हकिगतप्रमाणे भा. न्या. संहिता कलम ३०३(२), ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समजले.
या इसमांकडून एकूण ७४,४००/- रुपये किमतीचे ८०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने हस्तगत करून मोलगी पोलिस ठाणे गु.र.नं. ७६/२०२५ हा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश मिळाले आहे.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलिस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, पोहेकॉ मुकेश तावडे, मनोज नाईक, विशाल नागरे, राकेश मोरे, पोना मोहन ढमढेरे, पोकों अभय राजपुत, आनंदा मराठे, रामेश्वर चव्हाण अशांनी केली आहे.