गोवा पोलिसांच्या मदतीने नंदुरबार पोलिसांकडून सराईत गुन्हेगार जेरबंद.

गोवा पोलिसांच्या मदतीने नंदुरबार पोलिसांकडून सराईत गुन्हेगार जेरबंद.
नंदुरबार: शरीराविरुद्ध तसेच मालमत्तेविरुद्ध गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या सराईत फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोव्यातून ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, नागेश ऊर्फ नाकक्षा दमण्या पाडवी, रा. कात्री, ता. धडगाव हा आरोपी गोवा राज्यातील कळंगुट परिसरात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार, पाटील यांनी तात्काळ एक पथक गोव्याला रवाना केले.गोवा पोलिसांच्या मदतीने या पथकाने कळंगुट परिसरात शोध घेऊन नागेश उर्फ नाकक्षा पाडवी याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याचे खरे नाव राज्या ऊर्फ नाकक्षा ऊर्फ नागेश दमण्या पाडवी (वय २७ वर्षे) असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीविरुद्ध नंदुरबार जिल्ह्यात शरीर आणि मालमत्तेसंबंधी एकूण ०८ गुन्हे दाखल आहेत. याशिवाय, राज्याबाहेरही त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत, असे तपासात समोर आले आहे.
पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस आणि अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि. मुकेश पवार, पोहेकॉ सजन वाघ, मनोज नाईक, रमेश साळुंखे, पोना मोहन ढमढेरे आणि पो.शि. यशोदिप ओगले यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली.